

नागपूर - वाशिम जिल्ह्यातील रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघातील युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन तुकाराम इप्पर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ६०० कार्यकर्त्यांनी सोमवारी नागपूर येथे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना बावनकुळे यांनी सचिन इप्पर यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचे कौतुक केले. "तळागाळात काम करणाऱ्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असतो. विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. हा विकासाच्या विचारांचा विजय आहे असे ते म्हणाले. वाशिम जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांसह पूर्ण क्षमतेने काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला रीसोडचे निवडणूक प्रमूख नकुल देशमुख, भाजप नेत्या अमृता देशमुख, गजानन लाटे, सुभाषराव खरात , डॉ. बळीराम गरकल, भिकाजी नागरे, गजानन देशमुख आदी पक्षाचे पदाधिकारी,आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.