

नागपूर : वर्धा-नांदेड रेल्वेमार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीतील झाडाला रक्तचंदनाचे झाड असल्याचे सांगून रेल्वे विभागाकडून मिळालेली ५० लाख रुपयांची रक्कम चार आठवड्यांच्या आत न्यायालयात जमा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. संबंधित झाड रक्तचंदनाचे नसून ‘बिजासाल’ प्रजातीचे असल्याचा शास्त्रीय अहवाल समोर आल्यानंतर न्यायालयाने ही भूमिका घेतली.
वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीतील एका झाडाला रक्तचंदनाचे झाड असल्याचे सांगून मिळालेल्या ५० लाख रुपयांच्या मोबदल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्याने घेतलेली ५० लाख रुपयांची रक्कम चार आठवड्यांच्या आत न्यायालयात जमा करावी, असे निर्देश न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने सोमवारी दिले.
सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याने संबंधित झाड रक्तचंदनाचेच असल्याचा दावा कायम ठेवला. मात्र न्यायालयाने प्रथम रक्कम जमा करण्यास सांगितले. याचिकाकर्त्याने यासाठी दोन आठवड्यांचा अवधी मागितला असता न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत मंजूर केली. तसेच या प्रकरणी रेल्वे विभागाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या प्रकरणाची पार्श्वभूमी वर्धा-नांदेड रेल्वेमार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाशी संबंधित आहे. मौजा खर्शी येथील सर्व्हे क्रमांक १५ मधील केशव तुकाराम शिंदे आणि अन्य शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. त्यावेळी शेतातील झाडांचे मूल्यांकन करण्याची मागणी करण्यात आली होती. एका विशिष्ट झाडाबाबत ते दुर्मीळ रक्तचंदन प्रजातीचे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
या दाव्याच्या पडताळणीसाठी पुसद वनविभागाने बंगळुरू येथील काष्टविज्ञान आणि औद्योगिकी संस्थान या केंद्र सरकारच्या संस्थेकडे नमुने पाठवून तपासणी अहवाल मागविला होता. संस्थेने २३ मे २०२५ रोजी सादर केलेल्या अहवालात संबंधित झाड रक्तचंदनाचे नसून ‘बिजासाल’ प्रजातीचे असल्याचे स्पष्ट नमूद केले. त्यामुळे झाडाच्या प्रजातीबाबतचा दीर्घकाळचा संभ्रम दूर झाला.
यापूर्वी रक्तचंदनाचे झाड असल्याच्या दाव्यावर आधारित मूल्यांकनात झाडाची किंमत तब्बल एक कोटी रुपये ठरविण्यात आली होती. त्यापैकी रेल्वे विभागाने ५० लाख रुपये उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा केले होते आणि नंतर ही रक्कम याचिकाकर्त्याला देण्यात आली होती. मात्र, नव्या शास्त्रीय अहवालानुसार झाड ‘बिजासाल’ असल्याने त्याची किंमत केवळ दहा हजार रुपयांच्या आसपास असल्याचा दावा रेल्वे विभागाने केला आहे.
रेल्वे विभागाने मागील सुनावणीत सिव्हिल अर्ज दाखल करून ५० लाख रुपयांमधून झाडाची वास्तविक किंमत वजा करून उर्वरित रक्कम परत मिळावी, अशी मागणी केली होती. तसेच याचिकाकर्त्यांच्या वारसदारांनी पुसद येथील कनिष्ठ न्यायालयात संबंधित झाड रक्तचंदनाचे आहे की बिजासालचे, हे कायदेशीररीत्या सिद्ध करावे, अशीही मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, मूळ याचिकाकर्ते केशव तुकाराम शिंदे यांचे निधन झाले असून सध्या त्यांचे वारसदार या प्रकरणात पक्षकार आहेत. त्यामुळे आता या रकमेच्या परताव्याबाबत तसेच झाडाच्या प्रजातीसंदर्भातील अंतिम कायदेशीर निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात रेल्वे विभागातर्फे ॲड. नीरजा चौबे यांनी बाजू मांडली.
मौजा खर्शी येथील शेतातील एका झाडाला दुर्मीळ रक्तचंदन समजून त्याचे मूल्यांकन एक कोटी रुपये करण्यात आले होते. मात्र, बंगळुरू येथील शास्त्रीय संस्थेच्या अहवालात ते झाड रक्तचंदनाचे नसून ‘बिजासाल’ प्रजातीचे असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे विभागाच्या मते, बिजासाल झाडाची किंमत सुमारे दहा हजार रुपये आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांना देण्यात आलेल्या ५० लाख रुपयांच्या मोबदल्याचा मोठा भाग परत मिळावा, अशी मागणी रेल्वे विभागाने न्यायालयात केली आहे.