

नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या सत्तापक्ष नेता पदी ज्येष्ठ नगरसेवक बाल्या(नरेंद्र)बोरकर यांच्या नावाची घोषणा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी आज शनिवारी केली. महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या बोरकर यांच्या खांद्यावर पक्षाने ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
महापौर,उपमहापौरपदाची निवड येत्या 6 फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहातील विशेष सभेत केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली. दोन दिवसात नाव निश्चित होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता पूर्व नागपूरला सत्ता पक्षनेतेपद मिळाल्याने महापौरपद पश्चिम नागपूरलाच मिळण्याची चिन्हे अधिक आहेत.
सत्ता पक्षनेते बाल्या बोरकर हे गेल्या अनेक दशकांपासून नागपूरच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या निवडीमुळे पक्षाने एका निष्ठावान आणि अनुभवी नेत्याच्या खांद्यावर सभागृहाची जबाबदारी सोपवली आहे. प्रशासकीय कामाची उत्तम जाण आणि सर्वसामान्यांशी असलेला दांडगा संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे.