नागपूर : उपराजधानीत ४८ तासांत ४० हून अधिक मृत्यू

File Photo
File Photo

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : औषध तुटवडा आणि अपुऱ्या सुविधांमुळे नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३१ जणांचा मृत्यू आरोग्य यंत्रणेतील गलथानपणा उघड झाल्यानंतर राज्य सरकार जागे झाले असताना राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही गत ४८ तासांमध्ये ४० हून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याने दहशतीचे वातावरण आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील बहुतांशी रुग्ण हे अखेरच्या क्षणी सरकारी रुग्णालयात रेफर केलेल्यांपैकी असल्याने नेमके मृत्यू कशामुळे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दारिद्र्य रेषेखालील रुग्णांसाठी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) ही दोन सर्वात मोठी शासकीय रुग्णालये एकमेव आधार आहेत. या रुग्णालयांवर नागपूर विदर्भासोबतच शेजारच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड ,तेलंगना या प्रांतातून येणाऱ्या रुग्णांचा भार असतो. एम्स येथे मोठ्या संख्येने गरीब रुग्ण उपचारार्थ येत असतात. मेडिकलमधील खाटांची क्षमता १९०० तर मेयोतील खाटांची क्षमता ८५५ वर आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही रुग्णालयातील बहुतांश आंतररुग्ण विभाग हाउसफूल्ल असतात. अनेकदा इतरत्र उपाय झाले डॉक्टरांनी हात टेकले, आर्थिक पाठबळ संपले की अत्यवस्थ अवस्थेत मेडिकल – मेयोत रुग्ण रेफर केले जातात, यातील बहुतांश रुग्ण शेवटच्या घटका मोजत असतात. एकट्या मेडिकलमध्ये उपचारादरम्यान दररोज सरासरी १५ हून अधिक जण दगावतात. मेयोत दररोज किमान ७ जण उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतात. परंतु या दोन्ही रुग्णालयातील रुग्णांची संख्या पाहता हा सामान्य आकडा असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. या दोन्ही रुग्णालयातील मृत्यूंची महिन्याची सरासरी काढली तर मेडिकलमध्ये उपचारादम्यान दगावणाऱ्या रुग्णांची दरमहा संख्या ५०० च्या वर तर मेयोतील दरमहा मृत्यू संख्या २५० च्या वर जाते. आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने बघ्याची भूमिका घेणारे सरकार या मृत्यूंना मृत्यू मानत नाही का, याचे सोयरसुतक सरकारला नाही का असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

मेडिकलमध्ये आठवडाभरात 100 मृत्यू एकट्या मेडिकलमध्ये गेल्या आठवडाभरात आतापर्यंत १०० हून अधिक जण उपचारादरम्यान दगावलेत. दुसरीकडे मेयोत ४५ हून अधिक जण दगावले. ठाणे पाठोपाठ आता नांदेड मधील मृत्यूवरून सरकार निशाण्यावर असताना मेडिकल- मेयोतील शेकडो मृत्यूची साधी दखलही घेतली जात नसल्याने ही कसली एकतर्फी संवेदनशीलता असा सवाल नागपूरकर जनता विचारत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news