Nagpur Crime : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला केले ब्लॅकमेल

९८ हजार रुपये रोख आणि २५ हजारांचे सोन्याचे दागिने उकळल्याचा आरोप; २० वर्षीय आरोपीला अटक
Video viral blackmailing case
Video viral blackmailing case Pudhari
Published on: 
Updated on: 

नागपूर : अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करणे आणि त्याआधारे ब्लॅकमेल करून आर्थिक लूट करण्याचे प्रकार वाढत असताना नागपुरातील कळमना परिसरात संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत २० वर्षीय युवकाने तिच्याकडून तब्बल ९८ हजार रुपये रोख आणि २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दागिने उकळल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी कळमना पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध पॉक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी आयुष वंजारी हा पारडी परिसरातील रहिवासी आहे. जून २०२६ मध्ये १६ वर्षीय पीडिता त्याच्या संपर्कात आली होती. त्यानंतर आरोपी तिला वारंवार फिरायला जाण्याच्या बहाण्याने बाहेर घेऊन जात असल्याचे तपासात समोर आले आहे. याचदरम्यान त्याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिचे अश्लील व्हिडिओ तयार केले.

या व्हिडिओचा आधार घेत आरोपीने ते इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यास समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी पीडितेने आरोपीच्या मागणीनुसार वेगवेगळ्या वेळी ९८ हजार रुपये रोख आणि सुमारे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दागिने त्याला दिल्याचा आरोप आहे.

सुरुवातीला पीडितेने भीतीपोटी हा प्रकार कुटुंबीयांपासून लपवून ठेवला. मात्र, नंतर कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आणि आरोपी आयुष वंजारी याला अटक केली. आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.