

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील प्रमुख असल्याची बतावणी करत नागपुरातील दोन सराफांना गंडा घालणाऱ्या एका महाठगाविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीचे नाव राजबिर चावला असे नाव आहे.
लक्ष्मीनगर येथील रोकडे ज्वेलर्समध्ये बुधवारी रात्री 7 वाजताच्या सुमारास गेल्यानंतर त्याने काही लाखांचे दागिने खरेदी केले. मात्र चेक अर्थात धनादेशाने पेमेंट करीत असल्याचे त्यांनी सांगताच रोकडे ज्वेलर्सचे संचालक तसेच नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव तसेच विदर्भाचे अध्यक्ष राजेश रोकडे यांना संशय बळावला. त्यांनी थेट गडकरी यांच्या कार्यालयकडे या व्यक्तीचा फोटो पाठवून, फोन करून याविषयीची खातरजमा करून घेतली असता असे कुणालाही पाठवले नसल्याचे उघडकीस आले.
दरम्यानच्या काळात त्याला दुकानातच बसवून ठेवण्यात आले असताना त्याने संधी साधून पळ काढला. ही बाब रोकडे यांनी सीसीटिव्ही फुटेजसोबत सराफा व्यवसायिकांच्या ग्रुपमध्ये शेअर केली. अखेर याच पद्धतीने त्याने नागपुरातील दोन बड्या सराफा व्यावसायिकांना पाच, पाच लाख रुपयांच्या दागिन्यांनी गंडवल्याचे तसेच चेकने पेमेंट केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर या संदर्भात अंबाझरी पोलीस ठाणे मध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती राजेश रोकडे यांनी दिली