

Nagpur Uppalwadi Flat Drug Raid
नागपूर : जरीपटका, कपिलनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने उप्पलवाडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये धाड घालून एका आरोपीस अटक करून सुमारे सव्वा दोन कोटींचे साडेसात किलो एमडी (मेफेड्रोन) जप्त केले. मजहरने चार ते पाच वेळा उत्तर प्रदेशातून एमडी आणून नागपूर व मध्य प्रदेशात त्याची विक्री केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
शहर पोलिस दलाच्या इतिहासात ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते. मजहर अली अकबर अली (३०, रा. आझादनगर, टेकावस्ती, पाचपावली) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो टॅक्सी चालक आहे.
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका ओला चालकाला अटक केली. त्याच्या चौकशीदरम्यान मजहरचे नाव समोर आले. पैशाचे आमिष दाखवून तो चालकांना एमडीची विक्री करायला लावत असल्याचे उघडकीस आले. मजहर याने ड्रग्ज साठविण्यासाठी उप्पलवाडी परिसरात फ्लॅट भाड्याने घेतला. काही दिवसांपूर्वी तो उत्तर प्रदेश व दिल्लीला गेला. तेथूनही त्याने एमडी आणली.
ती या फ्लॅटमध्ये लपवून ठेवली. याबाबत खात्री पटताच पोलिसांनी कारवाई केली. फ्लॅटची झडती घेतली असता १४ पाकिटांमध्ये साडेसात किलो एमडी आढळली. या फ्लॅटमध्ये राहणारी महिला तस्करीत सक्रिय आहे किंवा नाही याचा तपास पोलिस करीत असून इतर सहकाऱ्यांचा शोध सुरू आहे.