Nagpur Mayor | नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नीता ठाकरे विराजमान; महायुतीचा बालेकिल्ला अबाधित

निवडणुकीत नीता ठाकरे यांना विजयासाठी आवश्यक असणाऱ्या आकड्यापेक्षा अधिक मते मिळाली
Nagpur Mayor | नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नीता ठाकरे विराजमान; महायुतीचा बालेकिल्ला अबाधित
Published on
Updated on

नागपूर : उपराजधानीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. भाजपच्या उमेदवार नीता ठाकरे यांनी १०४ मते मिळवून काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शुक्रवारी, ६ फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साही वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

विजयाचे संख्याबळ

या निवडणुकीत नीता ठाकरे यांना विजयासाठी आवश्यक असणाऱ्या आकड्यापेक्षा अधिक मते मिळाली. भाजपचे स्वतःचे १०२ नगरसेवक असून त्यांना शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या प्रत्येकी एका सदस्याने मतदान केले. त्यामुळे ठाकरे यांच्या पारड्यात एकूण १०४ मते पडली. दुसरीकडे, काँग्रेसच्या उमेदवार स्नेहल ठाकरे यांना पक्षाची ३४ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची २ अशी एकूण ३६ मते मिळाली. विशेष म्हणजे, एमआयएम (६), मुस्लिम लीग (४) आणि बहुजन समाज पक्षाचा १ अशा एकूण ११ सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

उपमहापौर आणि स्थायी समितीची लगबग

महापौर निवडीचा निकाल जाहीर होताच उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली. सभागृहातील संख्याबळाचे समीकरण स्पष्ट असल्याने भाजपच्या उमेदवार लीलाताई हाथीबेड यांची निवड आता केवळ औपचारिकता उरली आहे. या निवडीनंतर महापालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'स्थायी समिती'च्या १६ सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे.

नवनिर्वाचितांचे स्वागत

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनियुक्त महापौर, उपमहापौर आणि इतर सदस्यांचा सत्कार जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या विजयामुळे महापालिकेत भाजप आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news