

Nagpur girlfriend killed over suspicion
पुढारी ऑनलाईन डेस्क: पश्चिम नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाभा परिसरात प्रेयसीची लोखंडी रॉडने हत्या केली. ६ एप्रिलरोजी रात्री ८.३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून तरुणाने प्रेयसीची डोक्याच्या मागील बाजूस रॉड मारून निर्घृण हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हेमलता वैद्य असे ३० वर्षीय मृत प्रेयसीचे नाव आहे. ती पतीच्या मृत्यूनंतर नागपुरात मुलीसह राहत होती. एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये ती काम करत होती. तिचे अक्षय दाते या तरुणासोबत तीन वर्षापासून प्रेम होते. दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आहेत. हेमलताच्या चारित्र्यावर अक्षय नेहमी संशय घेत होता. त्यावरून दोघांचे भांडण होते असे. अक्षयने हेमलताशी वाद घालत डोक्याच्या मागील बाजूस धारदार शस्त्राने वार करत जखमी केले.
सोसायटीतील लोकांनी हेमलताला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी अक्षयला तत्काळ अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गिट्टीखदान पोलीस करीत आहे.
डोक्यावर तब्बल 16 वेळा आघात
इमारतीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली आहे. अक्षय इमारतीत गेला आणि वर जाऊन लोखंडी रॉड घेऊन आला. पार्किंगमध्ये बसलेल्या हेमलतावर त्याने रॉडने हल्ला केला. त्याने एक- दोन नव्हे तर तब्बल 16 वेळा हेमलता यांच्या डोक्यावर रॉडने आघात केला. हेमलता अक्षरश: किंचाळत होत्या पण त्यांच्या मदतीसाठी कुणीही पोहोचू शकला नाही.