

नागपूर : जिल्ह्यातील कुही तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. खरबी येथील शेतात पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून झोपडी बांधत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने पुष्पा सखाराम वैद्य (वय ५०) या महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
पुष्पा वैद्य या आपल्या शेतात झोपडी बांधण्याचे काम करत होत्या. याचवेळी त्यांना विजेच्या तारेचा स्पर्श होऊन जोरदार धक्का बसला आणि त्या जागीच बेशुद्ध पडल्या. काही वेळाने त्यांचा मुलगा पंकज शेतात आला असता, आई दिसून न आल्याने त्याने शोधाशोध सुरू केली. तेव्हा पुष्पा बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्यांच्या शरीराला विजेची तार चिकटलेली होती.
पंकजने प्रसंगावधान राखून दुपट्ट्याच्या साहाय्याने तार दूर केली. त्यानंतर त्याने आईला बैलगाडीतून घरी आणले आणि तेथून तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यास बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून पुष्पा यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे वैद्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.