

नागपूर : चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून यातील रोख पळविल्याच्या घटना आजवर अनेक घडल्या मात्र, तीन चोरट्यांनी आता अख्खी एटीएम मशीनच शिताफीने काढली आणि ती चोरून नेली. ही मशीन चोरताना तीनही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा-पारशिवनी मार्गावरील भानेगाव टी पॉइंटजवळ घडली.
रात्री देखील वर्दळ असलेल्या भोपाळ दिल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या एटीएम सेंटरमधून ही एटीएम मशीन चोरून नेल्याची घटना बुधवारी भानेगाव येथे उघडकीस आली. ही घटना रात्री पावणे दोन वाजता घडली असल्याचे सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहे. भानेगाव टी पॉइंट पासून पारशिवनी मार्गावर 200 मीटर अंतरावर निलेश राऊत यांचे घर आहे. घराच्या बाहेर दोन सीसीटिव्ही लागले आहेत. घराच्या समोर अंगणात वकरंगी कंपनीचे एटीएम मशीन लागले आहे. मंगळवारी रात्री दीड वाजता दरम्यान पारशिवनी मार्गाकडून पांढऱ्या रंगाची चारचाकी मालवाहू गाडी निलेश राऊत यांच्या घराजवळ येऊन थांबली.
गाडीतून तीन व्यक्ती उतरले आणि एटीएम मशीन जवळ आले. त्यांनी एटीएम मशीनमध्ये आणि एटीएम मशीन रूम मध्ये लागलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यावर काळया रंगाचा स्प्रे मारला. दुसरीकडे निलेश राऊत यांच्या घरी लागलेला कॅमेरा बंद करण्यासाठी चोरांनी वायर कापली. मात्र तो वायर बंद असलेल्या लाईटचा होता. चोरांना वाटले की कॅमेरा बंद झाला. तिन्ही चोरांनी एटीएम रूम मध्ये जाऊन एटीएम मशीन उचलून चार चाकी वाहनात लोड केली. मालवाहू गाडीत आधीच एक गाडी चालक बसला होता. चौघेही मालवाहू गाडीत बसून एटीएम मशीन पारशिवनिच्या दिशेने घेऊन गेले. हा सर्व चोरीचा प्रकार निलेश राऊत यांच्या घरी लागलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. बुधवारी पहाटे पाच वाजता मॉर्निंग वॉकिंगसाठी जात असताना एटीएम मशीन न दिसल्यान 112 वर कॉल करून एटीएम मशीन चोरी झाल्याची माहिती नीलेशनी पोलिसांना दिली.
नोव्हेंबरमध्ये निलेश राऊत याने वकरंगी कंपनी कडून एटीएम मशीनची एजन्सी घेतली होती. एटीएम मशीन ट्रे मध्ये पैसे लोड करणे, मशिनची देखभाल दुरुस्ती करणे ही सेवा कमिशनवर निलेश राऊत पुरवत होता. मंगळवारी निलेश राऊत याने एटीएम मशीन ट्रे मध्ये 172000 रुपये लोड केले होते. 129700 रुपये ग्राहकांनी एटीएम मधून काढले होते. 42300 रुपये मशीन मध्ये शिल्लक होते. 210000 रुपये एटीएम मशीनची किंमत आहे. एटीएम मशीन आणि त्यात असलेली कॅश अशी एकूण 252300 रुपयाचा माल चोरांनी चोरून नेला. स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण , खापरखेडा पोलीस स्टेशन येथील पोलीस आरोपीच्या शोधात पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीत शोध मोहीम सुरू आहे.