

नागपूर : १७ मार्च रोजी नागपुरातील हंसापुरी सेवासदन परिसरात उसळलेल्या हिंसाचारात दोन गटांच्या संघर्षात एका गटाने घेरून मारल्याने गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा शनिवारी (दि.२२) इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इरफान अन्सारी (वय ३८, रा, नवाज नगर,यशोधरानगर) असे त्याचे नाव असून तो फॅब्रिकेशन व्यवसायात वेल्डर म्हणून काम करीत होता.
मध्यप्रदेशातील इटारसी येथे एक काम मिळाल्याने सोमवारी रात्री ११ च्या सुमारास तो मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी निघाला. समोर दोन गटात दगडफेक सुरू असल्याने ऑटोवाल्याने त्याला मध्येच सोडून दिले. पायी चालत पुढे जात असताना एका गटाने त्याला समोरून दगडफेक करणाऱ्या गटातील असल्याचे समजून लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. पोलिसांनी त्याला वेळीच सोडवले पण डोक्याला जबर गंभीर जखमा होत्या. पोलिसांनी त्याला अत्यवस्थ अवस्थेतच नजीकच्या इंदिरा गांधी मेयो रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून गेले सहा दिवस तो व्हेंटिलेटरवर होता अखेर शनिवारी त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, इरफानच्या मृत्यूस जबाबदार प्रकरणी संतोष गौर नावाच्या एका तरुणास अटक करण्यात आली असून इतराना देखील ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच प्रकरणी मध्य नागपूरचे भाजप आमदार प्रविण दटके यांनी संचारबंदी सुरू असताना समर्थकांसह थेट तहसील पोलिस ठाणे गाठून पोलिसांवर दबाव टाकल्याचा आणि यात तुम्ही तुमच्या पद्धतीने तपास करा. आम्ही आमच्या पद्धतीने करू, अशा आशयाचे पोलिस उपायुक्त यांच्याशी बोलताना संभाषण असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे दोन्ही बाजूंनी वातावरण तापले. पुराव्यानिशी अटकेची कारवाई केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
मारहाण प्रकरणी अटकेत असलेला गौर निरपराध असल्याचा आमदार दटके यांचा तर इकडे इरफान हा आमच्या कुटुंबातील कमावता पुरुष, कुटुंबाचा आधार होता. रेल्वे स्थानकावर जाताना जमावाने घेरून मारले. त्याला उजैबा नामक पत्नी, एक जैनब नामक १७ वर्षाची मुलगी आहे. निरपराध इरफानची हत्याच झाली असल्याने संबंधितांवर खुनाचे गुन्हे दाखल करा, त्याचबरोबर राज्य शासनाने कुटुंबात एकाला नोकरी आणि ठोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. दुसरीकडे या हिंसाचार प्रकरणी अटकेतील आरोपींची संख्या शनिवारी १०६ वर पोहचली आहे. मुख्य आरोपीसह इतराना न्यायालयीन ,पोलिस कोठडी २५ मार्चपर्यंत सुनावण्यात आली आहे. आरोपीत विधीसंघर्ष दहा अल्पवयीन मुलांचा समावेश असून सोशल मिडीयाचा वापर यात मोठ्या प्रमाणात झाल्याने अटकेतील लोकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे आठवडाभर शाळा बंद असल्याने विद्यार्थी, व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिकांचे होणारे कोट्यवधींचे नुकसान झाले. वाढत्या मागणीनुसार दंगलग्रस्त भागात रविवारी (दि.२३) संचारबंदी उठविण्यात आल्याने दोन्हीकडे परस्पर सौहार्द कायम होईल, अशी अपेक्षा पोलिसाना आहे. संचारबंदी उठविली गेली असली तरी ठिकठिकाणी मात्र आणखी काही दिवस कडक बंदोबस्त राहण्याची चिन्हे आहेत.