

नागपूर : गेल्या काही दिवसांत उपराजधानीत चर्चेत असलेल्या हवाला रॅकेटचे तार थेट जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे. भाड्याने घेतलेल्या खात्यात हवालाची रक्कम जमा करणे हे या रॅकेटचे काम असून, गुन्हे शाखा पोलिसांनी एका आरोपीला मंगळवारी जम्मू-काश्मीर येथे अटक केली. दरम्यान, या प्रकरणात यापूर्वीच 23 जणांना अटक करण्यात आली आहे.
तूर्तास यासंदर्भात पोलिस गोपनीयता बाळगून आहेत. बेरोजगार युवकांना आपल्या जाळ्यात ओढून भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याच्या आमिषाने ही टोळी त्यांची बँक खाते भाड्याने घेत होती. यात हवाला, ऑनलाईन, सट्टा अशी कोट्यवधीची रक्कम जमा केली जाते यानंतर संबंधिताचा मोबाईल हॅक करून ही रक्कम काही वेळात अन्य खात्यांमध्ये वळती केली जाते.
यानंतर ती रक्कम चीन व कंबोडियातील विविध खात्यांमध्ये पाठविली जाते. या व्यवहाराचे पर्यायाने रॅकेटचे नियंत्रण चीन व कंबोडियातून केले जाते. याविषयीची माहिती स्वतः पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली. भाड्याने बँक खाते घेत हवालाचा व्यवहार करणार्या 23 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.