

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप बंडखोर माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी अर्ज भरू नये यासाठी स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण त्यांचा शोध घेत राहिले. त्यांचा, समर्थक मित्रमंडळींचा फोन लागेना, शेवटी चव्हाण अनिल सोले यांच्या घरी जाऊन बसले, निरोप दिला. पण सलग दुसऱ्यांदा तिकीट न मिळाल्याने रुसलेले मास्तर घरी न येता थेट अर्ज भरून मोकळे झाले. आता ते माघार घेतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ते आमचे नेते आहेत, नक्की माघार घेतील असा दावा केला आहे.
अनिल सोले नाराज असले तरी त्यांची नाराजी काही काळापुरती असू शकते, असे काहींचे म्हणणे होते. त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली जाईल, असाही तर्क होता.
प्रा. सोले यांनी सुशिक्षित तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, शिक्षण, कौशल्यविकास तसेच पदवीधरांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. पदवीधरांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता या सर्व प्रकारानंतर दोन दिवसात सर्वच चित्र स्पष्ट होणार आहे.
नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण १८ उमेदवारांनी २४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण अर्जांची संख्या ३० वर पोहोचली आहे. आज, ६ ऑक्टोबर हा नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
दाखल अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होणार असून, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ ऑक्टोबरपर्यंत आहे. मतदान २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडेल. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण केली जाणार आहे.