

नागपूर : उपराजधानीत जीबीएसचा तिसरा बळी गेल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. मेडिकल शासकीय रुग्णालयात शुक्रवारी जीबीएसचा हा तिसरा मृत्यू झाला. हा 32 वर्षीय रुग्ण मध्यप्रदेशातील रहिवासी आहे.
प्रकृती खालावल्यावर त्याला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो अनेक दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होता. नागपुरात हळूहळू हे रुग्ण वाढताना दिसत असून आजपर्यंत या आजाराचे तब्बल २१ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मेडिकल रुग्णालयात एक साडेसात वर्षांचा मुलगा व एक वयस्क असे दोन रुग्ण अत्यवस्थ आहेत. नागपूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्णांची मेडिकलमध्ये नोंद झाली. मेडिकलमध्ये आजपर्यंत जीबीएस रुग्णांची संख्या १२ आहे. दरम्यान, नागपुरातील विविध रुग्णालयात आढळलेल्या रुग्णांपैकी नऊहून जास्त रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. मेडिकलमधून एका रुग्णाच्या कुटुंबीयांनी इतर रुग्णालयात हलवले. तर चार रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी परतले.
जीबीएस हा एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर विकार आहे. बहुतेक व्यक्ती काही आठवड्यांत बरे होतात; तर काहींना महिनाभराचा कालावधी लागतो. या आजाराची लागण झालेले सुमारे ८० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात, १५ टक्के रुग्णांमध्ये काही काळ अशक्तपणा असू शकतो व पाच टक्के रुग्णांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.