

राजेंद्र उट्टलवार
नागपूर : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, गॅससाठा मुबलक प्रमाणात असून त्याचे प्रशासनामार्फत काटेकोर सनियंत्रण केले जात आहे, असा दावा जिल्हा प्रशासनामार्फत वारंवार केला जात आहे. मंगळवारपासून (दि.24) शहरातील विविध पेट्रोल पंपावर लागलेल्या वाहनांच्या रांगा भविष्याची चिंता वाढविणाऱ्या दिसत आहेत.
अनेक पेट्रोल पंप बंद झाले असून स्टॉक नसल्याचे बोर्ड लागले असल्याने लोक संतप्त आहेत. अनेकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मायबाप सरकार टंचाई नाही मग पेट्रोल पंपावर, गॅससाठी रांगा का ? हा त्यांचा सवाल आहे. साठेबाजी होत असताना पोलिस, प्रशासन याकडे डोळेझाक करताना दिसत आहेत. हातावर पोट असणारा सामान्य माणूस कामधंदा सोडून रांगेत लागणार कसा आणि गरजेपेक्षा अधिक पेट्रोल कशाला घेणार ? हा सवाल काहींनी उपस्थित केला.
याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वरिष्ठ पातळीवरून आढावा घेत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला आवश्यक तेवढीच इंधनाची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. मात्र, रामनवमीच्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमात या गर्दीत वाढ आज दिसत आहे. शहरात अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.
पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर उर्जेबाबत केंद्र शासन तसेच राज्य सरकारकडूनही यापूर्वीच स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने विविध अत्यावश्यक बाबींच्या सनियंत्रणासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. दरम्यान ,अत्यावश्यक सेवेबाबत चुकीच्या अफवा पसरविणाऱ्यांबद्दल अथवा यात अडथळा आणणा-यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुन्हा स्पष्ट केले. मात्र, हा विश्वास निर्माण करण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याने लोक नाराज आहेत.