

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरात २३ सप्टेंबरला झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने क्षतीग्रस्त झालेल्या नागरिकांना ५ ऑक्टोबरपासून दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप होणार आहे. आतापर्यंत २२ हजार पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने महानगरपालिका प्रशासनाची मदत घेतली असून सर्व भागातील पंचनामे तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी सध्या ५० चमू कार्यरत आहेत. जवळपास १८० कर्मचारी दररोज युद्धपातळीवर हे काम करीत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस,मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या दौऱ्यानंतर जिल्हा व महानगर प्रशासनाने नुकसान भरपाईच्या संदर्भातील कामे गतिशील केली आहेत.मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले असून शहराच्या सीमावर्ती भागातील पंचनामे सध्या सुरू आहेत.
दरम्यान, ज्यांचे पंचनामे झाले नाही त्यांनी संयम ठेवावा प्रशासनाकडून सर्वांचे पंचनामे करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. राज्य शासनाकडून दहा हजार रुपये सानुग्रह निधी जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या संदर्भातील प्रक्रिया बँकेमार्फत उद्या दुपारपासून सुरू होईल. ५ ऑक्टोबरला खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. पंचनामे करण्यात आलेल्या खातेधारकांनी याबाबतची खातरजमा करावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.