

नागपूर - एकीकडे नागपुरात भर दुपारी कडक उन्हात अचानक जोरदार वादळी वाऱ्यांनी पावसाळी वातावरण निर्माण केले असताना उत्तर नागपुरातील वैशाली नगर उड्डाणपुलाच्या शेजारी एका फटाका गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. यात तीन दुकाने खाक झाल्याने अडीच कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मनपा अग्निशमन विभागाने दिली. बिनाकी मंगळवारी परिसरातील मेहंदीबाग कॉर्नर येथे ही आग लागली. जवळच दाट वस्ती असल्याने आणि फटाक्यांचे धूमधडाम आवाज होत ही आग अधिकच भडकत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
मॉडर्न फटाका, फॅन्सी फ्रेम ग्लास आणि साईकृपा ट्रेडर्स या तीन दुकानांना या भीषण आगीने वेढले. या दुकान मालकांची नावे गुलाम बदर, अदनान फजल मुसा, विजय भगतसिंग कुकडे अशी असून अंदाजे किमान दोन ते अडीच कोटींचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. ही आग विझविण्यासाठी मनपा सिव्हिल लाईन्स, गंजीपेठ, सक्करदरा, वाठोडा, नंदनवन, लकडगंज, त्रिमूर्ती नगर, कळमना अशा एकंदर 8 अग्निशमन केंद्रातील अग्निशमन गाड्या आणि कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. दुपारी सव्वा तीन वाजतापासून रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत तब्बल पाच तास ही आग विझविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत फ्युएल कोल कॉर्पोरेशन इंडिया लिमीटेड, एचपी पेट्रोल पंपच्या मागे, आसोली, भंडारा रोड, कापसी येथे कोळसा भंडारात आग लागली. कळमना अग्निशमन केंद्रातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.