

नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नागपूर शहर तर्फे मंगळवारी अग्निशमन दलातील फायरमॅनच्या रिक्त जागा भरतीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले.
शिवसेना शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात मनपा मुख्यालयी या आंदोलन, घोषणाबाजीने वातावरण तापले. अग्निशमन विभागात २.५ वर्षापासून प्रलंबित असलेल्या फायरमन भरती प्रक्रियामुळे अनेक तरुण-तरुणी बेरोजगार असल्याचा संताप शिवसेनेने मनपा आयुक्त, प्रशासक अभिजीत चौधरी यांना घेराव प्रसंगी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड येथे अग्निशमन दलाच्या एका कार्यक्रमात अग्निशमन विभागाला प्राधान्य देत कॅलिफोर्नियाच्या भीषण आगीबाबत अमेरिकेच्या सरकारने योग्य अग्निसुरक्षा न दिल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे सांगितले. परंतु स्वतःच्या शहरात मात्र केवळ ११ फायर स्टेशन आहेत. नियमानुसार २ लाख लोकसंख्येप्रमाणे १ स्टेशन प्रमाणे किमान २० फायर स्टेशन गरजेचे असून प्रत्येक स्टेशनला प्रति शिफ्ट २० फायर मॅनची आवश्यकता असल्याने तीन शिफ्ट मिळवून एकूण ६० फायर मॅन याप्रमाणे २० स्टेशनला १२०० फायर मॅनची आवश्यता आहे. परंतु महानगरपालिकेत फक्त १२७ स्थायी फायर मेन असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आहे. उन्हाळ्यात अग्नीतांडवाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. या पार्श्वभूमीवर त्वरित भरती न झाल्यास मोठ्या दुर्घटना घडू शकतात असा इशारा यावेळी नितीन तिवारी यांनी दिला. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरातच जर अग्निशमन दलाचा मोठा तुटवडा असेल, तर सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार?असा सवाल केला.
२०२३ पासून ३५२ फायरमनची भरती प्रक्रिया प्रलंबित आहे. आवेदन करणारे ७००० स्थानिक युवक ,युवती यांनी वयोमर्यादा पार झाल्याकडे लक्ष वेधले. आंदोलनाचा इशारा दिला. सर्वोच्च न्यायालयात अद्याप निर्णय न झाल्यामुळे स्वराज्य संस्था निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत असल्या तरी विविध राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र स्थानिक मुद्द्यांवर आंदोलनांना वेग आल्याने दिसत आहे.
या आंदोलनात दीपक कापसे ,युवासेना जिल्हा प्रमुख प्रीतम कापसे, युवासेना शहर प्रमुख आशिष हडगे, युवासेना जिल्हा चिटणीस अब्बास भैय्या, युवासेना विभागीय सचिव अपूर्वा पित्तलवार, मुन्ना तिवारी आदी असंख्य युवक युवती उपस्थित होते.