

नागपूर : वाढते औद्योगिकरण, शहरीकरणामुळे अग्निशमन दलापुढील आव्हाने वाढत असून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणारी देशातील एकमेव संस्था असलेल्या नॅशनल फायर सर्व्हिसेस कॉलेजला आता जागेची कमतरता भासत आहे. प्रशिक्षणार्थींची वाढती संख्या बघता कॉलेजला होस्टेलसाठी आवश्यक 7 एकर जागा मिळवून देण्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.
राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी) मध्ये १४ ते २० एप्रिल दरम्यान राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. बावनकुळे यांनी यानिमित्ताने अग्निसुरक्षा प्रात्यक्षिकांचे तसेच, एनएफएससी परिसरातील अद्ययावत तांत्रिक अग्निशमन उपकरणे आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. तसेच शहिदांना आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे संचालक जयंत पाठक, डॉ. दिनकर वाकडे, अविनाश देऊस्कर, विमला देऊस्कर, श्रीनिवास वैद्य, एनएफएससीचे संचालक नागेश शिंगणे, प्रा. डॉ. ए. आर. सोनटक्के, आर. एम. क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
अग्निशमन दलाने सादर केलेली विविध रोमांचक प्रात्यक्षिके बघून सारेच भारावून गेले. राष्ट्रीय स्तरावरील हे फायर कॉलेज नागपूरची शान असल्याचे सांगत होस्टेलच्या जागेसाठी पंधरा दिवसात बैठक लावण्यात येईल असा शब्द बावनकुळे यांनी दिला.
नागेश शिंगणे यांनी राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहात राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. ए. आर. सोनटक्के यांनी आभार मानले.