

नागपूर पुढारी वृत्तसेवा : गेली अनेक वर्षे नागपूरकर, वैदर्भीय कलारसिकांनी बघितलेले स्वप्नपूर्तीच्या मार्गावर आहे. नागपूर येथे १०० हेक्टरमध्ये भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांनी दिल्या आहेत. या निर्णयाचे सांस्कृतिक विश्वात स्वागत झाले.
आशयसंपन्न मराठी चित्रपटांची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, त्यासाठीची समिती गठीत करुन या कामास गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री मुनगंटीवार यांनी विविध महत्वाचे निर्णय घेतले.
विविध पायाभूत सुविधा आणि अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या वैभवात आता भर पडणार आहे.अनेक प्रतीथयश साहित्यकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते देणाऱ्या विदर्भाच्या भूमीत चित्रनगरी व्हावी अशी मागणी वर्षानुवर्षे सुरू आहे. मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी पूरक वातावरण आणि संधीची उपलब्धता वाढवण्याचा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न असून त्यादृष्टीने मुबंई आणि कोल्हापूरप्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही सुरु करण्याचे मुनगंटीवार यांनी या बैठकीत सांगितले.यावेळी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, चित्रनगरी मुबंईच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता संघटनेचे , पदाधिकारी, इतर संबंधित उपस्थित होते.