Nagpur Crime : बनावट शालार्थ ओळखपत्र घोटाळ्यात सहा महिन्यांनंतर पुन्हा अटक; शिक्षकाला बेड्या

Fake Shalarth ID Card Scam : अटक झालेल्यांची संख्या ४५ वर : ५८० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बनावट ओळखपत्रे जारी केल्याचा प्रकार
scam
ScamPudhari
Published on: 
Updated on: 

नागपूर : राज्यभर गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बनावट शालार्थ ओळखपत्र घोटाळ्यात पोलिसांनी पुन्हा कारवाईचा वेग वाढविला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून थंडावलेल्या अटकसत्राला आता पुन्हा सुरुवात झाली असून, नागपूर गुन्हे शाखेच्या सायबर विभागाने आणखी एका शिक्षकाला अटक केली आहे. ज्ञानेश्वर शिवराम जाधव (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव असून, ते हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा येथील चित्रलेखा प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या शालार्थ ओळखपत्राची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी पोलिसांनी त्यांच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली. या कारवाईमुळे या प्रकरणातील अटक झालेल्यांची संख्या ४५ वर पोहोचली आहे.

५८० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बनावट ओळखपत्रे

शालार्थ घोटाळा गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उघडकीस आला होता. प्राथमिक तपासात नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून आतापर्यंत सुमारे ५८० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कथितरीत्या बनावट शालार्थ ओळखपत्रे जारी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या ओळखपत्रांच्या माध्यमातून शासकीय वेतन प्रणालीचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पुढील तपासात या घोटाळ्याचे धागेदोरे नागपूरपुरते मर्यादित नसून राज्यातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्र तपास समित्याही स्थापन करण्यात आल्या. नागपूरसह नाशिक आणि अन्य जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारची प्रकरणे समोर आल्यानंतर राज्य सरकारने चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नियुक्त केली.

शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तपासाची शक्यता

या प्रकरणात आतापर्यंत शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षक, शिक्षक, शाळा संचालक आणि अन्य कर्मचाऱ्यांसह एकूण ४५ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून अटकसत्र थांबल्याचे चित्र होते. आता पुन्हा एका शिक्षकाला अटक झाल्याने या घोटाळ्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, बनावट ओळखपत्रे तयार करण्यापासून ते त्यांना मान्यता देण्यापर्यंत नेमकी कोणाची भूमिका होती, याचा शोध घेतला जात आहे. तपासाची व्याप्ती वाढल्यास आणखी काही शिक्षक, कर्मचारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बहुचर्चित घोटाळ्यातील पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्यातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.