
नागपूर : प्रशासन विभाग विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असताना विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त यांच्या नावाने ठिक-ठिकाणी पत्रव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे प्रशासनात खळबळ माजली असून नागपूर पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या बोर्डा गावातील ए.एम.सय्यद असे या व्यक्तीचे नाव असून विभागीय आयुक्तालयातील सामान्य प्रशासन उपायुक्त असा उल्लेख असणारे लेटर हेड वापरून विविध प्रशासकीय विभागास बनावट पत्रव्यवहार केल्याची बाब समोर आली आहे. मुळात ए.एम.सय्यद नावाची व्यक्ती किंवा तसे पद विभागीय आयुक्त कार्यालयातच नसून या व्यक्तीकडून कोणत्याही पद्धतीचा पत्रव्यवहार झाल्यास तो जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तपासून घ्यावा आणि आवश्यकतेनुसार यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तालयातील सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे. डेप्युटी कमिशनर जीएडी, सेंट्रल मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिव्हीजनल कमिश्नर ऑफिस, नागपूर डिव्हीजन या आशयाच्या लेटरहेडद्वारे २ सप्टेंबर व २० ऑक्टोबर रोजी अनुक्रमे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि अभय खारकर, कॅफे हाऊस बोर्डा, (ता वरोरा जि. चंद्रपूर) यांच्या नावाने बनावट पत्रव्यवहार झाल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाला कळविण्यात आले आहे.
अशा बनावटी पत्रव्यवहाराद्वारे गुंडाकडून छेडछाड होत असल्याबाबत, गटविकास अधिकाऱ्यास नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता वेतन थकबाकी अदा केली नसल्याबाबतचा उल्लेख आढळून आला आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीची वारंवार विविध प्रशासकीय विभागास पत्र व्यवहार करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असून भविष्यात शासकीय यंत्रणा व इतर व्यक्तींचे नुकसान होवू नये, म्हणून चंद्रपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. यासोबतच नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे व या व्यक्तीविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना अपर आयुक्त कुलकर्णी यांच्याकडून देण्यात आले आहे.