Nagpur factory blast | एसबीएल एनर्जी स्फोट, आणखी एका महिलेचा मृत्यू, मृतकांची संख्या 20
नागपूर : जिल्ह्यातील एसबीएल एनर्जी कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील गंभीर जखमी आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 20 झाली आहे. आम्रपाली कालसर्पे यांचे काल रात्री ११ वाजता निधन झाले.
ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. या घटनेने नागपूर जिल्ह्यातील विविध स्फोटक निर्मिती कंपनीच्या सेफ्टी ऑडिटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विधिमंडळात देखील याविषयी लक्षवेधी चर्चा झाली. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत 15 दिवसापूर्वी ही भीषण घटना घडली.
रविवारी (1 मार्च ) झालेल्या एसबीएल स्फोट प्रकरणात चौधरी बंधूसह 21 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. 11 जणांना अटक झाल्यानंतर इतर आरोपी विदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी कंपनीचे मालक आलोक चौधरी (रायपूर छतीसगड) यांच्यासह १० आरोपीविरूद्ध लुकआउट नोटीस काढली आहे. यात संजय चौधरी यांचाही समावेश आहे.

