

नागपूर : विधानसभा निवडणुकीत एकटाच लढला सर्वांशी भिडला,लाडक्या बहिणींचा लाडका अजित दादा असे पोस्टर लावून चर्चेत आलेले राष्ट्रवादी शहर काँग्रेस अध्यक्ष प्रशांत पवार यांनी आगामी मनपा निवडणुकीत किमान 40 जागा लढवू 37 निवडून आणू असा दावा केला आहे.
महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रितपणे लढण्याबाबत निर्णय झालेला नसताना त्यांच्या दाव्याने भाजपमध्येही अस्वस्थता पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे हे दबाव तंत्र देखील असू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. महायुती सरकारला जनतेने निवडून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचा वारसदार ठरविला. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर विजय मिळाला. विक्रमी 6 वेळा या राज्याचे ते उपमुख्यमंत्री होणार असल्याने शपथविधी सोहळ्याचा आनंदोत्सव नागपुरात साजरा केला जाणार असल्याची माहिती प्रशांत पवार यांनी पत्र परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनदांचे वातावरण आहे. येत्या दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. 3 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी शहर कार्यकारीणीच्या बैठकीत ठराव पारीत करून एकमताने 40 जागांवर निवडणूक लढवण्याचे ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील 2 वर्षात नागपुर शहरातील विविध भागांत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आंदोलने केली, मोर्चे काढले, रस्ते, गडर लाईन, पाण्याची समस्या सोडविण्यात पक्षाला यश मिळाले. महानगरपालिकेत महापौर हा महायुतीचाच करण्याचा निश्चय बोलून दाखविला.
यावेळी माजी नगरसेवक राजेश माटे, दक्षिण-पश्चिम अध्यक्ष संदीप सावरकर, दक्षिण अध्यक्ष अरविंद भाजीपाले, उत्तर अध्यक्ष राकेश बोरिकर, मध्य अध्यक्ष रवि पराते, पूर्व अध्यक्ष अमरीश ढोरे, विद्यार्थी अध्यक्ष विश्वजीत तिवारी, व्यापारी आघाडी अध्यक्ष आशीष मदान आदी उपस्थित होते.