

Taufiq Ahmed Suspension
नागपूर: नागपूरचे जिल्हा वक्फ अधिकारी तौफीक अहमद शफीक अहमद यांना महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारींची निष्पक्ष चौकशी तसेच मंडळाची प्रतिमा अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष यांच्या समक्ष छत्रपती संभाजीनगर येथे 25 सप्टेंबर रोजी वैयक्तिक उपस्थिती लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, संबंधित अधिकारी आदेशाचे पालन न करता अनुपस्थित राहिल्यामुळे वरिष्ठांच्या निर्देशांचे अवहेलनाचे प्रकरण प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, निलंबनाच्या कालावधीत त्यांना केवळ निर्वाह भत्ता (Subsistence Allowance) मिळणार आहे. याच काळात त्यांचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथील राज्य वक्फ मंडळाचे मुख्यालय असेल. निलंबनाच्या काळात त्यांना मंडळाच्या अधिकृत कामकाजात सहभागी होण्याची परवानगी नसेल.