Nagpur News : दीक्षाभूमीवर मनपा नियंत्रण कक्षाचे लोकार्पण

क्यूआर कोड स्कॅन करताच मिळणार संपूर्ण माहिती; अनुयायांसाठी १,२८५ शौचालयांची व्यवस्था
Nagpur News
Nagpur News : दीक्षाभूमीवर मनपा नियंत्रण कक्षाचे लोकार्पणPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

नागपूर : ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचे रविवारी (दि. १८) लोकार्पण करण्यात आले. यावेळी अनुयायांना आवश्यक माहिती देणाऱ्या पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. यंदा ही माहिती पुस्तिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. मदत कक्षात लावलेला क्यूआर कोड स्कॅन करताच संपूर्ण माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी मनपाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दीक्षाभूमी परिसरात १,०५५, अंबाझरी तलावाच्या पायथ्याशी १८०, तर बेजनबाग आणि उंटखाना मैदान येथे ४० शौचालयांच्या सीट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा एकूण १,२८५ शौचालयांच्या सीट्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र १४० स्नानगृहांची आणि हात, चेहरा व पाय धुण्यासाठी ५० वॉश बेसिनची व्यवस्था करण्यात आली आहे.

पिण्याचे पाणी, प्रकाश आणि सुरक्षा व्यवस्था

अनुयायांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी रस्त्यांवर १२० नळांची व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक निवारा केंद्रातही पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिसरात अतिरिक्त प्रकाशव्यवस्थाही करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेतर्फे ४४ स्थायी आणि १६ अस्थायी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या माध्यमातून पोलीस विभागाला सुरक्षा व्यवस्थेसाठी सहकार्य करण्यात येणार आहे. वाहतुकीच्या सोयीसाठी १६० ई-बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन सज्ज

आरोग्य सुविधांसाठी दीक्षाभूमी परिसरातील चारही बाजूंच्या चौकांमध्ये आरोग्य सहाय्यता केंद्रे उभारण्यात आली असून, रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन विभागाचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.

पावसाची शक्यता लक्षात घेऊन पर्यायी निवाऱ्यांची व्यवस्था

धम्मचक्र प्रवर्तन दिनादरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिकेने पर्यायी निवाऱ्यांची व्यवस्था केली आहे. यासाठी परिसरातील मनपाच्या मालकीच्या आठ शाळा व इमारती, तसेच खासगी संस्थांच्या जवळपास ४० इमारती अधिग्रहित करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसामुळे अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news