

नागपूर - भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे काल सायंकाळी उशिरा लागलेल्या भीषण आगीत अनेक कुटुंबांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक कुटुंबियांकडून व्यथा ऐकून घेतल्या. जळालेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रत्येक बाधित कुटुंबाला खनिकर्म महामंडळामार्फत २.५ लाख रुपये, राज्य शासनाकडून २३ हजार रुपयांची मदत, तसेच कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर संस्थानकडून २० लाख रुपये, अत्यावश्यक भांडी देत असल्याचे राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले.
यावेळी अर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जैस्वाल, स्थानिक आमदार डॉ संजय मेश्राम, सरपंच वैशालीताई चौधरी, माजी आ. राजू पारवे, सुधीर पारवे, आनंदराव राऊत, प्रमोद घरडे, उपविभागीय अधिकारी उमेश चव्हाण आदींनी बाधितकुटुंबियांच्या व्यथा ऐकून त्यांना धीर दिला.
काल रात्री अचानक आलेल्या वादळवाऱ्यात आगीने अनेक घरांना वेढून टाकले. घटना कशी घडली ते पोलीस यंत्रणा पूर्ण तपास करेल मात्र गावकऱ्यांनी जी एकजूट व धैर्य दाखवत कोणतीही जीवित हानी होवू दिली नाही हे महत्वाचे आहे.
अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदत व पुनर्वसनाच्या कामांचा आढावाही आम्ही घेतला आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. यासोबतच अन्नधान्य, जीवनावश्यक साहित्य याचे वाटप आरोग्य शिबिर, पाणी टँकर, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके व गणवेश, तसेच जळालेल्या कागदपत्रांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीसर्व घरांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणात शासन निश्चित मदत करेल असे स्पष्ट करून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या घरबांधणीसाठी मोफत रेती व्यवस्था करू असे सांगितले. ज्यांच्याकडे अतिरिक्त खोल्या उपलब्ध आहेत त्यांनी आपली घरे बाधित कुटुंबांना तात्पुरती भाड्याने द्यावीत अशी गावकऱ्यांना त्यांनी विनंती केली.
अशा आहेत उपाययोजना
▪️खनिकर्म महामंडळामार्फत प्रत्येक बाधित कुटुंबाला घर बांधणीसाठी २.५ लाख
▪️राज्य शासनाकडून तातडीने २३ हजार रुपयाची आर्थिक मदत
▪️ कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर संस्थानकडून २० लाख रुपयाची मदत
▪️उमरेड एमआयडीसीतील कंपन्यांकडून सीएसआर माध्यमातून मदतीचे प्रयत्न
▪️प्रत्येक कुटुंबाला एक महिन्यापुरते अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य
▪️जखमी गुरेढोरे व जळालेल्या इतर साहित्यासाठी स्वतंत्र मदत
▪️घरांच्या बांधकामासाठी मोफत रेती
▪️विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश देण्याची व्यवस्था
▪️जळालेली महत्त्वाची कागदपत्रे पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिर
▪️गावात आठ दिवस आरोग्य शिबिर
▪️पिण्याच्या पाण्यासाठी टँकर