

नागपूर : राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे पहिले तीन दिवस होत असताना काँग्रेसला अद्यापही गटनेता निवडता आलेला नाही. याच संदर्भात आज मंगळवारी रात्री एक बैठक आयोजित करण्यात आली. यात सर्वांची मते जाणून घेतली गेली. मात्र हा निर्णय दिल्लीतच होणार असल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या असल्या तरी त्यांना बदलण्याची तूर्तास शक्यता नाही.
नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटी मधील बैठकीत एकेक आमदार,पराभूत उमेदवारांशी चर्चेतून निवडणुकीतील बारकावे, अपयशाची कारणे जाणून घेण्यात आली. सरासरी 13 ते 15 व्या मतगणना फेरीपर्यंत आपल्याला भाजप उमेदवारापेक्षा चांगले मताधिक्य होते. मात्र शेवटच्या काही फेऱ्यात अनपेक्षित निकाल लागल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या.ईव्हीएम विरोधात जनआंदोलन छेडले जाण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली.
राज्याचे प्रभारी रमेश चेनिथला,नाना पटोले,नितीन राऊत सोबतच या बैठकीनंतर निघाले. राज्यातील आमदार, पराभूत उमेदवाराकडून निवडणूक संदर्भात माहिती घेतली. याविषयीचा अहवाल उद्या दिल्लीत आपण देणार असून यानंतरच काँग्रेस गटनेतेपद ठरणार, प्रदेशाध्यक्ष पदाबाबत देखील निर्णय होणार अशी माहिती मिळाली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष बाबा आष्टणकर प्रामुख्याने उपस्थित होते.
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आपण काँग्रेस नेते, पराभूत उमेदवारांना भेटायला, त्यांचे विचार जाणून घ्यायला आलो असल्याचे सांगितले. आज कोणतीही नावाची घोषणा होणार नाही. पण, हायकमांडला अहवाल दिला जाईल.लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल. प्रदेश अध्यक्षावर आरोप करणाऱ्यावर कारवाई होत नाही याकडे लक्ष वेधले असता आपण ते सारे काही जाणून घेण्यासाठीच आलो आहे.