

नागपूर : माजी क्रिकेटपटू, सेवानिवृत्त हवाई दल अधिकाऱ्यांकडे साडेनऊ लाखांची चोरी करणाऱ्या चोरट्याला धंतोली पोलिसांनी २४ तासात अटक केली. चोरट्याने त्याच्या दोन २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने ही चोरी केल्याचे उघडकीस आले. एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडून ९.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निवृत्त हवाई दल अधिकारी प्रविण भास्करराव हिंगणीकर (५८, रा. रामछाया १०१, विवेकानंद नगर, धंतोली, नागपूर) हे २२ मे रोजी रात्री ८ वाजता त्यांचा मुलगा प्रथमेश याला भेटण्याकरीता पुण्याला गेले. २५ मे रोजी सकाळी त्यांच्याकडे काम करणारी महिला घरी आली तेव्हा तिला घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. तिने प्रविण हिंगणीकर यांना फोन करून घराचे मागचे दार उघडे असून सामान अस्ताव्यस्त पडले असल्याचे सांगितले. प्रविण हिंगणीकर यांनी त्यांचा भाचा अनुराग अविनाश कुलकर्णी यांना फोन करून माहिती दिली. अनुराग यांनी त्यांची पत्नी रश्मी कुलकर्णी यांच्यासोबत घरी जावून घटनेची व्हिडियो रेकॉर्डिंग करून पुण्याला असलेल्या हिंगणीकर यांना पाठविले. या प्रकरणी हिंगणीकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीचा पाठलाग सुरू केला. परिसरातील ३० ते ३५ ठिकाणी सीसीटिव्ही फुटेज तपासले आणि आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी आरोपी विशाल सुधीर पाटील ( रा. फ्लॅट क्रमांक ३, छाया अपार्टमेंट, प्लॉट क्रमांक ४७५, कुकडे ले-आऊट, रामेश्वरी रोड, अजनी, नागपूर) याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी आरोपीकडून चोरट्याने त्यांच्या घरातून ७ लाख २० हजारांचे १४९ वजनाचे सोन्याचे दागिने, ८० हजार ७५० रुपयांचे चांदीचे भांडे, १२ हजारांचे घड्याळ, ९५ हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली ३० हजारांची दुचाकी असा एकूण ९ लाख ३७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विशालचे वडील एका सरकारी कार्यालयात लिपिक म्हणून काम करतात आणि विशालला गांजाचे व्यसन आहे. यापूर्वी चंद्र्रपूरमध्ये विशालने पाच चोऱ्या केल्या आहेत. व्यसनामुळे त्याचे वडील नागपुर येथे स्थलांतरित झाले.