

नागपूर : एका गतिमंद महिलेवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीला नागपूरच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड उठवला आहे. न्यायाधीश जे.ए.शेख यांनी ही शिक्षा सुनावली.
दिलीप नथुजी शेंडे (वय-54 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना डिसेंबर 2017 मध्ये नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा पोलिस स्टेशन हद्दीत रोहणा गावात घडली होती. पीडित महिला गतिमंद असताना तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत दिलीपने तिच्यावर बलात्कार केला. ती गरोदर राहिली. तिच्या मावशीने ही बाब लक्षात येताच पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
सहाय्यक सरकारी वकील प्रशांत साखरे यांनी सरकारची बाजू मांडली. दरम्यान पीडितेने एका अपत्याला जन्म दिला. दिलीप आणि अपत्य अशा दोघांचीही डीएनए चाचणी केली असता तोच त्याचा पिता असल्याचे समोर आले. ही महिला आपले रक्षण करण्यास असमर्थ असताना तिचा गैरफायदा घेऊन केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे. त्यामुळे त्याला शिक्षा सुनावली जात असल्याचे न्यायालयाने प्रकर्षाने नमूद केले. दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपी नितीन उर्फ नरेंद्र नारनवरे याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. पीडीतेसाठी न्यायालयाने मनोधैर्य योजनेतून नुकसान भरपाई देण्याची शिफारस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे केली आहे.