

नागपूर- कर्तव्यात कुचराई केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी थेट बरखास्तीची कारवाई केल्यानंतरही नागपूर शहरातील कपिल नगर पोलीस स्टेशन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. रविवारी या भागात आणखी एका युवकाच्या हत्येने पोलिसांच्या कार्य प्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे. गेले काही दिवस रोज, दिवसाआड उपराजधानीत हत्येच्या घटना घडत आहेत. अनेक वस्त्यांमधील जनतेत भीतीचे वातावरण आहे.
यापूर्वी प्रॉपर्टी डीलर अंकुश कडू यांचे भर चौकात दुचाकीवरून पाडून एका जागेसाठी सुपारी देत घडविलेले हत्याकांड चर्चेत होते. आज रविवारी याच पोलिस स्टेशनच्या हद्दीत तथागत चौक येथे ही निर्घुण हत्या झाली. अतुल अर्जुन धारे वय 25, उमरी वाडी असे या घटनेतील मृतकाचे नाव असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविला आहे.