Nagpur Crime | मॅट्रिमोनियल साइटवर ‘परदेशी वर’ बनून महिलांना गंडा, महागडी गिफ्ट पाठवण्याचे बहाण्याने पैशांची फसवणूक!

नागपूर गुन्हे शाखेचा टोळीवर छापा; वर्धमाननगरातून सहा जणांना अटक, फसवणुकीची रक्कम हवालामार्फत दुबईला पाठवल्याचा संशय
Nagpur Crime | मॅट्रिमोनियल साइटवर ‘परदेशी वर’ बनून महिलांना गंडा, महागडी गिफ्ट पाठवण्याचे बहाण्याने पैशांची फसवणूक!
Nagpur Crime | मॅट्रिमोनियल साइटवर ‘परदेशी वर’ बनून महिलांना गंडा, महागडी गिफ्ट पाठवण्याचे बहाण्याने पैशांची फसवणूक!
Published on: 
Updated on: 

नागपूर : मॅट्रिमोनियल वेबसाइटवर स्वतःला परदेशी वर असल्याचे भासवून महिलांशी ओळख वाढवायची, विश्वास संपादन केल्यानंतर महागडे गिफ्ट पाठविल्याचे सांगायचे आणि ते कस्टममध्ये अडकल्याचा बनाव करून विविध शुल्कांच्या नावाखाली पैसे उकळायचे, अशा पद्धतीने महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. वर्धमाननगर परिसरातील भाड्याच्या बंगल्यातून पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली असून, फसवणुकीतून मिळालेली रक्कम हवालामार्फत दुबईला पाठविण्यात आल्याचा संशय आहे.

नागपुरातील एका महिलेने फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काही जणांनी तिच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी स्वतःची ओळख परदेशी नागरिक म्हणून करून देत सुरुवातीला महिलेशी संवाद वाढविला. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर महागडे गिफ्ट पाठवत असल्याचे सांगण्यात आले.

काही दिवसांनी संबंधित गिफ्ट कस्टम विभागाने अडविल्याचे सांगून महिलेशी पुन्हा संपर्क साधण्यात आला. गिफ्ट सोडविण्यासाठी कस्टम क्लिअरन्स, विविध शुल्क तसेच अन्य कारणे सांगून तिच्याकडून पैसे उकळण्यात आल्याचा आरोप आहे. एकदा पैसे मिळाल्यानंतर वेगवेगळी कारणे पुढे करून आणखी रकमेची मागणी केली जात होती. त्यानंतर काही काळाने पीडितेशी संपर्क पूर्णपणे तोडला जात असल्याचे तपासात समोर आले.

वर्धमाननगरातील बंगल्यातून कारभार

महिलेची तक्रार मिळाल्यानंतर नागपूर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. डीसीपी दीपक अग्रवाल यांच्या देखरेखीखाली पोलिसांनी माहितीच्या आधारे सापळा रचला. त्यानंतर वर्धमाननगर परिसरातील एका भाड्याच्या बंगल्यावर कारवाई करून सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या टोळीने याच पद्धतीने आणखी किती महिलांना लक्ष्य केले आहे, याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. आरोपींचे मोबाइल फोन, डिजिटल रेकॉर्ड तसेच आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे.

पैशांचे ‘दुबई कनेक्शन’ तपासात

फसवणुकीतून मिळालेली रक्कम नेमकी कुठे आणि कोणाच्या खात्यात वळती करण्यात आली, याचाही तपास सुरू आहे. ही रक्कम हवालामार्फत दुबईला पाठविण्यात आली का, याचीही गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news