Nagpur Mahavitran News | महावितरणच्या बिनाकी उपविभाग कार्यालयात सहाय्यक अभियंत्यावर हल्ला; कार्यालयातील तोडफोड, लॅपटॉपचे नुकसान

गुन्हा दाखल करण्यास सुरुवातीला विलंब झाल्याचा कर्मचारी संघटनेचा आरोप, सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
Nagpur Mahavitran News | महावितरणच्या बिनाकी उपविभाग कार्यालयात सहाय्यक अभियंत्यावर हल्ला; कार्यालयातील तोडफोड, लॅपटॉपचे नुकसान
Published on
Updated on

नागपूर : नागपूर येथील महावितरणच्या बिनाकी उपविभाग कार्यालयात सहाय्यक अभियंता सुबोध मंडपे यांच्यावर एका ग्राहकाने कार्यालयात घुसून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली असून अधिकृत लॅपटॉपचेही नुकसान झाले आहे. घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यास सुरुवातीला टाळाटाळ झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केला असून, या घटनेमुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या बिनाकी उपविभाग कार्यालयात सहाय्यक अभियंता सुबोध मंडपे हे नियमित शासकीय कामकाज करत असताना दुपारी सुमारे ३.३० वाजता काही ग्राहक कार्यालयात आले. यावेळी एका ग्राहकाने अचानक आक्रमक होत मंडपे यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली तसेच कार्यालयीन कामासाठी वापरण्यात येणाऱ्या लॅपटॉपचेही नुकसान करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

घटनेनंतर सहाय्यक अभियंता सुबोध मंडपे यांनी सहकारी कोंबाडे व चवरे यांच्यासह पाचपावली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, इतकी गंभीर घटना घडूनही सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केला आहे.

घटनेनंतर महावितरण प्रशासनाने तातडीने ठोस भूमिका घेतली नाही, अशी नाराजीही संघटनेने व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्याच्या सुरक्षिततेकडे आणि घटनेच्या गांभीर्याकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना सक्रिय झाली. संघटनेचे झोन संघटक बंटी बडगे यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात धाव घेत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच अधीक्षक अभियंता ते कार्यकारी अभियंता स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर एफआयआर नोंदविण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याचा दावा करण्यात आला आहे.

संपूर्ण प्रक्रियेदरम्यान झोन संघटक बंटी बडगे यांच्यासह सहाय्यक अभियंता आशित रामटेके, कोंबाडे, चवरे तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता राठोड हे पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित होते.

महावितरणच्या वर्ग-दोन अधिकाऱ्यावर कार्यालयात घुसून हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे संघटनेने म्हटले आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे नमूद करत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, महावितरणच्या सर्व कार्यालयांमध्ये सक्षम सुरक्षा व्यवस्था उभारावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news