

नागपूर - कळमेश्वर येथील एमआयडीसी परिसरात एशियन केमिकल्स प्रा. लि. या केमिकल्स कंपनीच्या कारखान्यावर कृषि विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली. या धाडीत शासकीय अनुदानित युरिया खताचा वापर हा केमिकल्स कंपनीमध्ये तयार होणा-या मेलामाईन आणि रेझिन या उत्पादनासाठी व्यावसायिकदृष्ट्या केला जात असल्याचे आढळून आले.
हा कारखाना आसिफ सलाट वय वर्ष ५२ यांचे मालकीचा आहे. युरिया या खतावर केंद्र शासनाचे अनुदान असून हा युरिया शेतक-यांना केवळ इ-पॉस मशीनद्वारे परवानाधारक कृषि सेवा केंद्रामार्फत विक्री करणे बंधनकारक असताना एशियन केमिकल्स प्रा. लि. यांनी युरिया खताच्या १०० पेक्षा जास्त बॅगचा साठा औद्योगिक वापराकरीता या कंपनीत करून ठेवल्याचे आणि त्याचा मेलामाईन आणि रेझिन उत्पादनाकरीता बॉयलरमध्ये वापर सुरु असल्याचे भरारी पथकास दिसून आल्याने गुण नियंत्रण शाखेच्या निरीक्षकांनी भरलेले, रिकामे पोते जप्त केले.
ही कारवाई राज्याचे निविष्ठा व गुण नियंत्रण संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुण नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी समाधान धूळधुळे, जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद रवींद्र राठोड, कळमेश्वर येथील तालुका कृषि अधिकारी श्रीमती दिपाली कुंभार जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक मार्कंड खंडाईत, तालुका गुण नियंत्रण निरीक्षक प्रशांत राऊत (कळमेश्वर), श्रीमती ऐश्वर्या सहारे (काटोल), ओमप्रकाश गहूकर (नरखेड) यांनी संयुक्तरित्या पार पाडली. कळमेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक मन्नान औरंगाबादे यांचेसह सहकारी उपस्थित होते. आरोपीविरुद्ध कळमेश्वर पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.