​Nagpur Crime | नागपुरातील चर्चित युवती आशी डेचा मृतदेह कान्हान नदीत आढळला; हत्या असल्याचा संशय!

 कान्हान नदीच्या पुलाखाली पाण्यात सापडला मृतदेह; पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा
​Nagpur Crime
​Nagpur Crime Pudhari File Photo
Published on
Updated on

नागपूर: नागपूर शहरातील चर्चित युवती आशी डे हिचा मृतदेह सोमवारी पहाटे नागपूर ग्रामीणमधील कान्हान नदीच्या पुलाखाली पाण्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण संशयास्पद असून हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून विविध अंगांनी तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कान्हान पोलिसांना नदीत एका तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती. मात्र, उपलब्ध छायाचित्रे व इतर माहितीच्या आधारे मृत युवतीची ओळख नागपूरातील चर्चित युवती आशी डे अशी प्राथमिक स्तरावर पटल्याचे समोर आले.

पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. प्राथमिक तपासात तरुणीची अन्यत्र हत्या करून मृतदेह कान्हान नदीत फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत निष्कर्ष शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कान्हान पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून मृत महिलेचे जुने वाद, वैयक्तिक संबंध, आर्थिक व्यवहार तसेच अलीकडील हालचालींची माहिती तपासली जात आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर मृत युवतीचे नाव पूर्वी काही वादग्रस्त प्रकरणांमध्ये चर्चेत आल्याचे बोलले जात असले, तसेच काही कथित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती व अमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराशी संबंधित व्यक्तींशी तिचे संबंध असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलिसांनी याबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस ड्रग्स नेटवर्क, वैयक्तिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा इतर कोणत्याही कारणांचा या प्रकरणाशी संबंध आहे का, याचाही तपास करत आहेत. मात्र, ड्रग्स कनेक्शनबाबतही अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. पोलिस सर्व शक्यतांचा तपास करत असून शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news