

Futala Lake Land Dispute
नागपूर : फुटाळा परिसरातील नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीवर हक्क व ताबा असल्याचा दावा करणारे महेंद्र जिचकर यांना न्यायालयात मोठा धक्का बसला आहे. संबंधित जमिनीचा ताबा घेण्यापासून महानगरपालिकेला रोखण्यासाठी दाखल केलेले दिवाणी अपील जिल्हा न्यायाधीश-६, नागपूर यांनी खर्चासह फेटाळून लावले आहे. त्यामुळे तात्पुरता मनाई आदेश देण्याची मागणी फेटाळणारा कनिष्ठ न्यायालयाचा ५ मे २०२६ रोजीचा निर्णय कायम राहिला आहे.
फुटाळा परिसरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीवर आपला हक्क व ताबा असल्याचा दावा करीत महेंद्र जिचकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. महानगरपालिकेने संबंधित जागेचा ताबा घेऊ नये, यासाठी त्यांनी तात्पुरत्या मनाई आदेशाची मागणी केली होती. मात्र, संबंधित विवादित जमीन ही त्यांच्या मालकीच्या ६०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडापेक्षा वेगळी असून, ती महानगरपालिकेच्या नियंत्रणाखालील सार्वजनिक जमीन असल्याचे न्यायालयीन नोंदींमधून स्पष्ट झाले.
विवादित जमिनीवर आपला हक्क असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध करण्यात अपीलकर्ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांना तात्पुरता मनाई आदेश देण्याचा कोणताही आधार नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. याप्रकरणी दाखल करण्यात आलेले Misc. Civil Appeal No. 137/2026 न्यायालयाने फेटाळून लावले.
या निकालामुळे महानगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीवरील अनधिकृत ताब्याविरुद्ध प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेला न्यायालयीन बळ मिळाले आहे. तसेच, महानगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीचा ताबा पुन्हा मिळविण्याच्या प्रयत्नांनाही या निर्णयामुळे महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
या प्रकरणात नागपूर महानगरपालिकेतर्फे अॅड. ए. एम. काझी यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांना विधी अधिकारी सुरज पारोचे आणि सहाय्यक विधी अधिकारी आनंद शेंडे यांनी सहकार्य केले.