

Congress meeting Nagpur
नागपूर : नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा आज (दि.७) माजी मंत्री सुनील केदार गट विरोधात काँग्रेसचे इतर गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते असे चित्र चव्हाट्यावर आले. थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच आक्षेप घेत निरीक्षकांना पाठवून ही बैठक अवैध ठरवली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीमध्ये आज इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, केदार गट, त्यांचे समर्थक जिल्हा अध्यक्ष अश्विन बैस यांनी अनेक दिवसांत एककल्ली कारभार सुरूच ठेवला असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. अखेर जिल्हा काँग्रेस निवड समितीच्या बैठकीवर प्रदेशाध्यक्षांचाच आक्षेप पुढे आला.
तातडीने नागपूर जिल्हा निरीक्षक माजी आमदार विरेंद्र जगताप, व दोन निरीक्षक अशोक बोबडे, उदय मेघे यांना नागपुरात पाठवून बैठकीत तंबी दिली गेली. शिष्टाचारानुसार जिल्हाध्यक्षांनी प्रदेश समितीचे सदस्य, व निरीक्षकांना न बोलाविता निवड समितीची ही बैठक घेतली.
या बैठकीत खासदार श्याम बवें, माजी मंत्री सुनील केदार, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक व उपाध्यक्ष सुरेश भोयर आदी निवडक केदार समर्थकच उपस्थित होते. शेवटी निरीक्षकांनी ही बैठक अवैध असल्याचे सांगून निघून गेले, अशी चर्चा आहे. केवळ एका गटाची बैठक आहे म्हणत इतर गटाची नाराजी पुढे आली, यामुळेच ही बैठक गुंडाळली गेली, अशी माहिती आहे.