

नागपूर : नागपूर शहरात सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई करत सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणाच्या घरातून देशी बनावटीचे पिस्टल, पाच जिवंत काडतुसे, धारदार तलवार आणि मोबाईल फोन असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ४ जुलै) पहाटे शहरात सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू होती. त्यावेळी सामाजिक सुरक्षा विभागाला गुप्त बातमीदारामार्फत एका व्यक्तीकडे बेकायदेशीर अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे प्रेमसिंग जितेंद्र बैस (वय २२, रा. सुदामपुरी, भांडे प्लॉट चौक, सक्करदरा) याने आपल्या घरात बेकायदेशीर अग्निशस्त्र लपवून ठेवल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत त्याच्या घरावर छापा टाकला.
या कारवाईत आरोपीच्या घरातून मॅगझिनसह एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे, एक लोखंडी तलवार तसेच ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ७३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार प्रकाश माथनकर यांच्या फिर्यादीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपीकडे हे अग्निशस्त्र कशासाठी होते, तसेच त्याचा इतर कोणत्याही गुन्ह्यांशी संबंध आहे का, याचा पुढील तपास सक्करदरा पोलीस करीत आहेत.