Nagpur News : नागपूर मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांचा धिंगाणा; जेल अधिकाऱ्यांना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी

धंतोली पोलिसांत गुन्हा दाखल; घटनेमागील कारणांचा तपास सुरू
Nagpur News : नागपूर मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांचा धिंगाणा; जेल अधिकाऱ्यांना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी
Published on
Updated on

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांनी ड्युटीवरील जेल अधिकाऱ्यांशी अर्वाच्य भाषा वापरत शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी दोन्ही कैद्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास नागपूर मध्यवर्ती कारागृहातील छोटी गोल विभागातील बॅरक क्रमांक १ समोर ही घटना घडली. त्यावेळी कारागृह अधिकारी वामन तुकाराम निमजे हे ड्युटीवर कार्यरत होते.

यावेळी कैदी दीपक उर्फ खत्या रामकृष्ण घनचक्कर आणि नादीर खान आतीर खान पठाण यांनी ड्युटीवरील कारागृह अधिकाऱ्यांशी अर्वाच्य भाषा वापरत शिवीगाळ केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे काही काळ कारागृह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर कारागृह प्रशासनाने धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपी कैद्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

दरम्यान, हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, याचा पोलीस तपास करत असून कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला जात आहे. घटना घडल्यानंतर कारागृहाच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news