

नागपूर - जिल्ह्यातील कामठी तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या (एमएसईबी) कार्यालयात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. हॉटेलसाठी नवीन वीज कनेक्शन मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक अभियंता अविनाश लक्ष्मण लांडेकर (३४) याला रंगेहात अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ३९ वर्षीय तक्रारदाराने येरखेडा परिसरात एक ब्लॉक घेतला असून तिथे त्यांना नवीन हॉटेल-रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी त्यांना 'थ्री-फेज' वीज कनेक्शनची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी कामठी येथील एमएसईबी कार्यालयात रीतसर अर्ज केला.
१.१० लाखांची मागणी
वीज कनेक्शनला त्वरित मंजुरी देणे आणि साइट व्हिजिट करून पुढील कार्यवाही लवकर पूर्ण करण्यासाठी सहाय्यक अभियंता अविनाश लांडेकर याने तक्रारदाराकडे १,१०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी अभियंत्याने यापूर्वीच तक्रारदाराकडून एक लाख रुपये घेतले होते. उर्वरित १० हजार रुपयांसाठी देखील त्याने तगादा लावला होता. अखेर तक्रारदाराने नागपूर एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने गुरुवारी कामठी येथील कार्यालयात सापळा रचला. विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.