

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकात तैनात असलेल्या एएसआय सिद्धार्थ पाटील यांना एमडी तस्कराशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून तडकाफडकी निलंबित केले. त्यामुळे गुन्हे शाखेत खळबळ उडाली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिले आहेत.
गुन्हे शाखेने ऑगस्ट महिन्यात कपिल गंगाधर खोब्रागडे, अक्षय बंडू वंजारी, राजेश अनंतराव गिरी या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून 90 लाख रुपये किमतीचे एमडी जप्त केले होते. या प्रकरणात गोलू बोरकर, अक्षय बोबडे, सोहेल व अनेक जण फरार होते. पोलिसांनी चौकशी केली असता अक्षय नंदनवन मधील गुन्हेगार गोलू याला एमडी विकत होता, असे समोर आले.
पोलिसांनी सखोल चौकशी केली असता कारवाई न करण्यासाठी एएसआय पाटील हे गोलू कडून नियमित वसुली करीत असल्याचे समोर आले. अखेर चौकशीत दोषी आढळल्याने पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी राजकीय दबावही असल्याची चर्चा जोरात आहे.