

Maharashtra municipal elections
नागपूर: मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मुंबई येथे "सत्याचा मोर्चा" काढून राज्य निवडणूक आयोगाला निवेदन दिले. मतदार याद्या स्वच्छ करून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्या अशी मागणी केली. तरीसुद्धा नगर पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकाची घोषणा करण्यात आली. यामुळे निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली असल्याचे दिसून येते. खरेतर संभ्रम दूर होण्यासाठी त्यांनी याद्या दुरुस्त करून निवडणुका घ्यायला पाहिजे होते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालीका आयुक्त यांच्या शासकीय निवासस्थानी १२० मतदारांच्या नोंदी आढळून आल्या आहेत. इतकेच नाही तर एका लहानशा खोलीमध्ये २००-२०० मतदारांच्या नोंदी असल्याचे समोर आले आहे. दुबार मतदार आहे तिथे डबल स्टार लावून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेऊ असे निवडणूक आयोग सांगत आहे, परंतु ही गोष्ट व्यवहारी नाही. मुंबई येथील मोर्चानंतर शिष्टमंडळ जेव्हा निवेदन घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडे गेले होते तेव्हा त्यांना तास न तास त्यांना बाहेर बसवून ठेवण्यात आले. आज राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, मतदार याद्या जेवढया स्वच्छ करता येईल तेवढया करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला फायदा होण्यासाठी राज्य निवडणूक आयोग काम करीत असल्याचे दिसून येत आहे असा आरोपही अनिल देशमुख यांनी केला.
जगात कुठेही ईव्हीएमवर मतदान घेतले जात नाही. निवडणुका पारदर्शक व्हाव्या यासाठी त्या बॅलेट पेपरवर घ्याव्या अशी मागणीसुद्धा आम्ही करत आहोत. परंतु त्याकडेही निवडणूक आयोग लक्ष देण्यास तयार नाही. अनेक इच्छुक उमेदवारांची नावेही त्यांनी कोणताही अर्ज न करता इतर ठिकाणी स्थानांतरित करण्यात आली आहेत. यामुळे त्यांच्या मतदानाच्या आणि निवडणूक लढविण्याच्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचे हनन होत आहे. यासाठी आम्ही न्यायालयात गेलो आहे याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.