

नागपूर - रविवारच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी परिवारासह कामठी जवळील कन्हान नदीच्या तीरावर गेलेल्या दोन कुटुंबांवर आज काळाने घाला घातला. एका ६ वर्षीय चिमुरड्यासह तिघांचा नदीच्या खोल डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
मृतांची नावे रोहित महादेव नागदेवे (वय ३५ वर्षे, रा. कुंभारे कॉलनी, कामठी), गौतम राजकुमार अंबादे (वय ३१ वर्षे, रा. इंदिरानगर, जरीपटका, नागपूर), चैतन्य बबलू अंबादे (वय ६ वर्षे, रा. जरीपटका, नागपूर) अशी आहेत.
खेळता खेळता चिमुरडा पाण्यात गेला आणि...
मिळालेल्या माहितीनुसार, कामठी येथील ई-रिक्षा चालक रोहित नागदेव हे आपल्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे कुटुंबासह महादेव घाटावर पिकनिकसाठी आले होते. त्याच वेळी नागपूरच्या जरीपटका येथील रहिवासी गौतम अंबादे हे देखील आपल्या कुटुंबातील ३ महिला, ३ मुली आणि ३ पुरुषांसह (एकूण १३ जण) याच ठिकाणी आले होते.
दुपारच्या सुमारास दोन्ही कुटुंबांतील सदस्य स्वयंपाकाच्या तयारीत व्यस्त होते. याच दरम्यान, जरीपटका येथील के.जी. १ मध्ये शिकणारा ६ वर्षीय चिमुरडा चैतन्य अंबादे हा नदीच्या पात्रात खेळण्यासाठी उतरला. खेळता खेळता त्याचा पाय घसरला आणि तो तेथे असलेल्या मोठ्या डोहात बुडू लागला.
चैतन्यला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी त्याचा काका गौतम अंबादे याने तात्काळ डोहात उडी घेतली. मात्र, गौतमला पोहता येत नसल्याने तोही पाण्यात बुडू लागला. हा गंभीर प्रकार जवळच उभे असलेल्या रोहित नागदेव यांच्या लक्षात आला. माणुसकीच्या नात्याने रोहित यांनीही त्या दोघांना वाचवण्यासाठी डोहात धाव घेतली, परंतु दुर्दैवाने पोहता येत नसल्याने रोहित सुद्धा त्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.
या तिघांना बुडताना पाहून गौतमचे वडील राजकुमार अंबादे (वय अंदाजे ५५) हे देखील नदीत उतरले. तेही मानेपर्यंत पाण्यात बुडाले होते, परंतु त्यांनी निकराची झुंज देत कसेतरी हातपाय मारून स्वतःचे प्राण वाचवले आणि ते पाण्याच्या बाहेर आले.
अन्न तिथेच पडून राहिले... क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले
दोन्ही कुटुंबांनी रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी आणि वनभोजनासाठी सर्व जेवणाची सामग्री सोबत आणली होती. मात्र, निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने घास घेण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. तयार केलेले जेवण आणि आणलेली खाद्य सामग्री घटनास्थळावर जशीच्या तशी पडून होती. या हृदयद्रावक प्रसंगामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.
पोलिसांनी स्वतः मृतदेह काढले
घटनेची माहिती मिळताच जुना कामठी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनीष हिवरकर आणि पोलीस उपनिरीक्षक सागर भंडारी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः नदीच्या डोहात उतरून शोधमोहीम राबवली आणि तिन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले.
'तो' जीवघेणा डोह ठरतोय मृत्यूचा सापळा
कन्हान नदीच्या महादेव घाट परिसरातील हा डोह अत्यंत खोल आणि धोकादायक आहे. यापूर्वीही या डोहात बुडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा डोह पर्यटकांसाठी 'मृत्यूचा सापळा' ठरत असून, प्रशासनाने या ठिकाणी धोक्याचे फलक लावावेत आणि सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.