

नागपूर : मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नागपूर शहर पोलिसांनी सुमारे १८ लाखांचा नायलॉन मांजा नष्ट केला. नायलॉन मांजाच्या हजारो चकऱ्यांवर नागपूर शहर पोलिसांनी सोमवारी (दि.१३) बुलडोजर फिरवला.
गेली काही वर्षे नायलॉन मांजाचा वाढता वापर पक्षी आणि माणसांसाठी जीवघेणा ठरत आहे. मकर संक्रांतीच्या या काळात अनेकांचा गळा, नाक कापल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच पक्षांचाही हकनाक जीव जात असल्याचेही समोर आले आहे. यासंदर्भात जनजागृतीसाठी विविध सामाजिक संघटनानी मोर्चेही काढले. महापालिकेने मध्यंतरी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त केला मात्र असे असूनही या जीवघेण्या नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरूच आहे.
बाजारात छुप्या पद्धतीने चढ्या दराने त्याची विक्री करणारे देखील अनेक महाभाग आहेत. याविरोधात नागपूर पोलिसांनी देखील आता कंबर कसली असून सोमवारी सायंकाळी १८ लाखाचा जप्त केलेला नायलॉन मांजा रोडरोलरच्या माध्यमातून पोलिसांनी नष्ट केला. या कारवाईचे नेतृत्व नागपुर शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल आणि डीसीपी निकेतन कदम यांच्या नेतृत्वात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले.