

नागपूर -काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे आगामी मनपा निवडणुकीत आघाडीचे संकेत आहेत. मुंबईत महापौर आमच्या आघाडीचाच होईल असा दावा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राज्यात राजकीय वैमनस्यातून भरदिवसा खून होत आहेत. खोपोली येथील नगरसेविकेच्या नवऱ्याची भर रस्त्यात हत्या करण्यात आली. सत्ताधारी आमदार आणि मंत्री अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाचे नाव घेऊनही कारवाई होत नाही यावरून पोलिसांचा वापर हा फक्त सत्ता टिकवण्यासाठी केला जातोय असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.
रत्नागिरी येथील हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. यात शिंदेसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश यांची भर रस्त्यात हत्या करण्यात आली. या प्रकरणात शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदार यांनी अजित पवार यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि नेत्यांवर हत्येचे आरोप केले. थेट पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करण्यात आले तरी तरीही कारवाई होत नाही. महायुती मधील पक्ष एकमेकांविरोधात हत्या, मारामारी करत आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असताना पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. म्हणजे तुम्ही मुडदे पाडा, हत्या करा कारवाईच होणार नाही ही भूमिका सरकारने घेतल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
वाशिममध्ये नकली नोटा सापडल्या.यातही भाजप निवडणूक प्रमुखांचे नाव समोर आले याबाबत पोलिसांनी फक्त तक्रार दाखल केली, पण अजूनही अटक केली नाही. याचा अर्थ सत्ताधारी पक्षांनी महाराष्ट्रात कितीही धुडगूस घातला तरी पोलिस थातुर मातुर कारवाई करून आरोपींना अभय देत आहेत.