MPSC Exam Centers : एमपीएससी परीक्षार्थींना मोठा दिलासा; मुंबईची वारी टळणार, चार प्रमुख शहरांत नवी केंद्रे

विदर्भ-मराठवाड्यातील एमपीएससी उमेदवारांची ससेहोलपट थांबली; नागपूर, अमरावती आणि संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्रे
MPSC
MPSC Pudhari
Published on
Updated on

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्यातील उमेदवारांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीने परीक्षा केंद्रांचे विकेंद्रीकरण केले असून आता नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या शहरांमध्येही केंद्रे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे केवळ परीक्षेसाठी मुंबई गाठण्याची उमेदवारांची मोठी कसरत टळणार आहे.

एमपीएससीकडून विविध जाहिरातींतर्गत प्राध्यापक संवर्गातील पदांच्या भरतीसाठी सुमारे ४२ विषयांच्या छाननी परीक्षा घेण्यात येणार आहेत. यापूर्वी या परीक्षांसाठी प्रामुख्याने मुंबईतच केंद्रे निश्चित केली जात होती. परिणामी भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर यांसह विदर्भातील विविध जिल्ह्यांतील उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी मुंबईपर्यंतचा मोठा प्रवास करावा लागत असे. प्रवासासोबतच निवास आणि भोजनाचा अतिरिक्त आर्थिक भारही त्यांच्यावर पडत होता.

विदर्भ व मराठवाड्यातील उमेदवारांचा ताण कमी

नागपूर आणि अमरावती येथे परीक्षा केंद्रे उपलब्ध झाल्याने विदर्भातील उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे, तर छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रामुळे मराठवाड्यातील उमेदवारांची सोय होईल. विशेषतः पावसाळ्यात लांब पल्ल्याचा प्रवास करून मुंबईला जाणे टळणार असल्याने उमेदवारांचा वेळ, पैसा आणि मानसिक ताण वाचणार आहे.

६ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी

परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या विद्यार्थी आघाडीकडून करण्यात आली होती. ६ जुलै रोजी विद्यार्थी आघाडीचे संयोजक शंतनू झाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन विदर्भ आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षा केंद्रे सुरू करण्याची मागणी केली होती. भाजयुमोचे अध्यक्ष सचिन करारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मागणी लावून धरण्यात आली होती; त्यानंतर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनीही या मागणीचा पाठपुरावा केला.

उमेदवारस्नेही व्यवस्थेचे स्वागत

एमपीएससीच्या या निर्णयाचे परीक्षार्थींनी मनःपूर्वक स्वागत केले आहे. नजीकच्या शहरांमध्ये परीक्षा केंद्र उपलब्ध झाल्यामुळे उमेदवारांचा प्रवासाचा आणि राहण्या-खाण्याचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे. अवघ्या काही तासांच्या परीक्षेसाठी मुंबईपर्यंत धावपळ करावी लागणार नसल्याने विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल. या विकेंद्रीकरणामुळे एमपीएससीची परीक्षा पद्धत अधिक उमेदवारस्नेही आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news