नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण असूनही पावसाने शुक्रवारी (दि.7) हुलकावणी दिली आहे. किमान 100 मिमी पाऊस पडेपर्यंत विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असा सल्ला शेतीतज्ञांनी दिला आहे. खरिप हंगामासाठी खते आणि बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागपूर विभागात सोयाबीन, कापूस, तूर आदी बियाण्यांना मागणी आहे. यासाठी 20 लाख 89 हजार 788 संकरीत कापूस पॅकेट तयार आहेत. तर सोयाबीनचे 1 लाख 40 हजार 364 क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.
खरिप हंगामासाठी पुरेशी खतांची उपलब्धता आहे. नागपूर विभागासाठी 6 लाख 40 हजार 100 मेट्रीक टन विविध खतांचे प्रकार मंजुर झाले आहेत. तर 4 लाख 35 हजार 399 मेट्रीक टन खतांची सध्या उपलब्धता आहे. त्यापैकी 36 हजार 640 मेट्रीक टन खतांची विक्री झाली आहे. तसेच 3 लाख 98 हजार 759 मेट्रिक टन खतांचा साठा विभागासाठी उपलब्ध आहे. अशी माहिती कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी दिली.
खरिप हंगामासाठी नागपूर विभागात 3 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. कापूस पिकाखाली 6 लक्ष 50 हजार हेक्टर क्षेत्र, तूर पिकाखाली 1 लक्ष 88 हजार, भात पिकाखाली 8 लक्ष 50 हजार क्षेत्राचा समावेश आहे. विभागात एकूण पिकाखाली 20 लक्ष 37 हजार हेक्टर तर इतर पिकाखाली 21 हजार हेक्टर क्षेत्रात खरिप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे.
खरिप पेरणी करताना शेतकऱ्यांनी स्वत:जवळील बियाणांचा वापर करावा. यासाठी बियाणांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी. पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावेत. खरेदी केलेल्या बियाणांची पावती घेऊन बियाणाचे पॅकेट सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी केले आहे.