

नागपूर : केवळ दोन हप्ते थकल्याने शेतकऱ्याचा जेसीबी परस्पर लिलावात विकल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज नागपुरातील सदर भागातील येस बँकेवर आक्रमक आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केली, तर बँकेच्या मालमत्तेचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
इंद्रजीत मुळे नावाच्या शेतकऱ्याने आपल्या जेसीबी वाहनासाठी येस बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यांनी नियमितपणे ३१ हप्ते भरले होते, मात्र केवळ दोन हप्ते थकीत राहिले. बँकेने कोणताही पूर्वकल्पना न देता किंवा संधी न देता थेट जेसीबीचा लिलाव केला, असा आरोप इंद्रजीत मुळे यांनी केला आहे. आपली कैफियत घेऊन ते मनसे पदाधिकाऱ्यांकडे गेले होते.
या अन्यायाविरोधात जाब विचारण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष चंदू लाडे आणि आदित्य दुरुगकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते मंगळवारी दुपारी येथील येस बँकेवर धडकले. कार्यकर्त्यांनी बँकेत घुसण्याचा प्रयत्न करत शटर उचलण्याचा प्रयत्न केला आणि काही काचा फोडल्या. काही संतप्त कार्यकर्त्यांनी बँकेच्या एका एक्झिक्युटिव्हला मारहाण केली. तसेच बँकेच्या भिंतींवर काळ्या स्प्रेने निषेधाच्या घोषणा लिहिण्यात आल्या.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत ५० पेक्षा जास्त मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. बँकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जोपर्यंत शेतकरी इंद्रजीत मुळे यांना त्यांचा जेसीबी परत मिळत नाही, तोपर्यंत आमचे हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. या प्रकरणामुळे बँकेच्या कर्ज वसुलीच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.