

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
होळी धुलीवंदनाच्या दिवशी आज (शुक्रवार) प्रतापनगर परिसरात असलेल्या राम भंडार हॉटेल रेस्टॉरंट येथे आगीची घटना घडल्याने खळबळ उडाली. किचनमध्ये असलेल्या फ्रीजरमधील कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती पुढे आली.
मोठी हानी झाली असली तरी सुदैवाने आज धुळवडचा दिवस असल्याने कुणीही जखमी झाले नाही. मनपा अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या व या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यापूर्वी देखील राम भंडारमध्ये आगीची घटना घडली होती अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, राम भंडारचे गुप्ता कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान या आगीत झाले. त्रिमूर्ती नगर अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार 30 लाख रुपयांचे नुकसान वेळीच आग नियंत्रणात आल्याने टळले.